ब्रेकिंग न्यूज

चांगभलं....च्या गजरात श्रीक्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत १५ वा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आटपाडी प्रतिनिधी 
 खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात रथोत्सवानिमित्त आज सकाळी श्रींची मुख्य मंदिरात सदरील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. दुपारी अडीच वाजता पालखी रथाचे जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी रथाला विविध प्रकारच्या आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच रथामधील पालखीत उत्सव मूर्ती विराजमान करण्यात आली होती.गुलाबी रंगाची पेशवाई पगडी घातलेली उत्सव मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. नगाराखाना प्रवेशद्वारातून रथ पेठेत आल्यानंतर चांगभलच्या गजरात भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली. चांगभलंच्या गजरा बरोबर भाविकांचा उत्साह दुणावत होता. यावेळी रथाच्या अग्रभागी धूप आरती व पारंपारिक वाद्ये होती.
 काल ज्या भाविकांना पालखी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही त्यांनी आज दर्शनाची पर्वणी साधली. दरम्यान मुख्य मंदिरात भाविकांचा ओघ कायम आहे. पालखी रथ मंदिरात परतल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी सेवेकरी, मानकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सिद्धनाथ मंदिरात हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
 गेली काही वर्षे रथासमोर डॉल्बी लावल्याने भाविकांत नाराजी व्यक्त होत होती. मात्र यावर्षी प्रशासनाने निर्बंध लावल्यानंतर युवक वर्गाने डॉल्बीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे रथोत्सव डॉल्बीमुक्त झाला. युवकांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
 खरसुंडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत त्रयोदशीच्या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Previous Post Next Post