खरसुंडी प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील राज्यात प्रसिद्ध असणारे खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासणकाठी व पालखी सोहळा तारीख 14 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. लाखोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी सज्ज झाली आहे.
यात्रेनिमित्त मुख्य मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्यासाठी दर्शन रांग,पिण्याचे पाणी,सुरक्षारक्षक सी. सी. टी.व्ही या सुविधा सज्ज करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेतील जागावाटप स्वच्छता पाणीपुरवठा या कामांना प्राधान्य दिले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व रस्त्यावर वाहन तळ उभा करून वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येणार आहे. दरम्यान झरे रोड नजीक भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात मोठी आवक झाली असून त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तंबू कार्यालय दाखल झाले असून पाणी, वीज या सुविधा बाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र यात्रेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली असल्याने बाजार समितीच्या सुविधा तोकड्या पडत असल्याचे दिसून आले.
यात्रेच्या अनुषंगाने मेवा मिठाई,प्रासादिक साहित्य, उपहारगृहे रसवंती मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने नवस व पूजा साहित्य बरोबरच पाण्याच्या बाटल्यांची मोठी आवक झाली आहे.
काल मध्यरात्री विठ्ठलापूरचे बाड व धावडवाडीचे मुस्लिम भाविकांचे मुख्य मंदिरात आगमन झाले. त्यांनी देवाची लोखंडी सासणकाठ्या घोङेखुर तार्थावर नेऊन स्नान घालून आज सकाळी पुन्हा जोगेश्वरी मंदिरात आणली आहेत.
भाविकांना पालखी सोहळ्याची ओढ लागली आहे.