आटपाडी प्रतिनिधी
चैत्र वध् द्वादशीच्या मुहूर्तावर ता. 14 रोजी खरसुंडी ता. आटपाडी येथे श्री सिद्धनाथांचा चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा संपन्न झाला.
सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीती ,गुलाल खोबऱ्याच्या मुक्त उधळण आणि सोबत चांगभलंचा गजर यामुळे नाथ नगरी दुमदुमून गेली.
मंगळवारी सासणकाठी व पालखी सोहळ्या निमित्त मुख्य मंदिरात श्रींची अश्वारूढ व उत्सव मूर्तीची सदरेवरील पूजा बांधण्यात आली होती. सकाळी धूप आरती झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. दुपारी गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या होत्या. पारंपरिक वाद्याच्या गजरात सासणकाठ्या तालबद्ध नाचवल्या जात होत्या. एक वाजता आटपाडीच्या पाटील बंधूंची मानाची सासनकाठी मुख्य मंदिरात दाखल झाली. दीड वाजता चिंचाळे येथील गायकवाड मानकरी यांना मंदिरात पाचारण करून मानपान करण्यात आला. दोन वाजता पालखीचे मानकरी जाधववाडी व तासगावकर मंदिरात दाखल झाले. यावेळी विठलापूर येथील हिंदू व धावडवाडी येथील मुस्लिम भाविकांनी परंपरेनुसार हातात सिंधीच्या फोका घेऊन नैवेद्य अर्पण केला . दुपारी अडीच वाजता देवस्थानचे प्रमुख मानकरी हर्षवर्धन देशमुख यांचे धुपारतीसह मंदिरात आगमन झाले. त्यांनी पालखीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
तीन वाजता पारंपरिक व शाही थाटाच्या लवाजम्यासह पालखीने मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. यावेळी पालखीसोबत घुपारती, सेवेकरी व मानकरी होते. नगरखाना प्रवेशद्वारातून पालखी बाहेर येताच भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची प्रचंड उधळण केली. मुख्य पेठेतून पालखी जोगेश्वरी मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी मानपान करण्यात आला. यावेळी विठलापुर व धावडवाडीचे मानकरी टकऱ्या घडश्यासह जोगेश्वरी मंदिरात दाखल झाले. टकऱ्या घडशाने देवाच्या लोखंडी सासणकाठीस टक्कर दिल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. पालखी सोहळा चार वाजता मुख्य मंदिरात परतल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
यात्रेमध्ये स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. तसेच ठीकठिकाणी अल्पोहाराची सोय करण्यात आली होती. यात्रे निमित्त नवस साहित्य,उपहारगृह व रसवंती गृह मोठ्या प्रमाणावर दाखल झाली होती. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, महसूल,पोलीस व आरोग्य प्रशासनाने नियोजन केले.
सासनकाठी सोहळ्या निमित्त मुख्य मंदिरात बांधण्यात आलेली अश्वारूढ पूजा.
📌 खरसुंडी यात्रा दृष्टीक्षेपात
चैत्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक.
📌 उन्हाच्या तडाख्यात ही भाविकांचा उत्साह कायम.
📌 मांढरदेव दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती काचोर आयोगाने केलेल्या शिफारशी व शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांची प्रशासनाकडून पायमल्ली.
📌नियोजन नसल्याने धूप आरती व पालखीमध्ये समन्वय राहिला नाही.त्यामुळे भाविकात संभ्रम.
📌गतवर्षीच्या तुलनेने गर्दीत घट.
📌 उच्च न्यायालयाच्या निर्देशा नंतरही अतिक्रमणे कायम.
📌 तात्यासाहेब रुपनवर या भाविकांकडून सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.