ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान मध्ये भाविकांने अर्पण केलेला चांदीचा फेटा गायब? ट्रस्ट कडून दुसराच फेटात दाखवल्याची पोलिसात तक्रार.

आटपाडी प्रतिनिधी 
 खरसुंडी ता.आटपाडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट मध्ये गेली काही महिने दगडी खांबावरील चांदी गायब झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच आता चांदीच्या फेट्याची भर पडली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की लाखो भाविकांचे कुलदैवत व जगभरातील गलाई बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात भाविक नवसपुर्तीसाठी अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण करतात. त्याप्रमाणे दिनांक 12 /8/ 2003 रोजी पांडुरंग सीताराम निकम रा. देवीखिंडी यांनी चांदीचा 1 किलो 500 ग्रॅम वजनाचा फेटा श्रीनाथ चरणी अर्पण केला होता. त्यानंतर आज त्यांचे बंधू शिवाजी सिताराम निकम यांनी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात सदरचा फेटा दाखवण्याची मागणी केली.त्यावेळी त्यांना ट्रस्ट कडून दोन फेटे दाखवण्यात आले.मात्र शिवाजी निकम यांना त्यांनी अर्पण केलेला फेटा असल्याची खात्री झाली नाही.
फेट्याचे वर्णन व वजन यामधील तफावतीमुळे त्यांचा संभ्रम कायम राहिल्याने त्यांनी श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट विरोधात आटपाडी पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे.
     दगडी खंबावरील 24 किलो चांदी नंतर आता 1 किलो 500 ग्रॅम फेट्याचे प्रकरण निर्माण झाले आहे.

 भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तू जातात कुठे?
 मोठ्या श्रद्धेने भाविक श्रीनाथ चरणी विविध वस्तू अर्पण करतात.त्यामध्ये प्रामुख्याने सोने व चांदीच्या पूजेच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे.या वस्तू अर्पण करताना त्यात चोख असाव्यात असा भाविकांचा कटाक्ष असतो. काही वेळा या अर्पण केलेल्या वस्तूंची भाविक पावतीही घेत नाहीत. मात्र कालांतरा नंतर या अर्पण केलेल्या वस्तू देवाच्या पूजेत अथवा देवस्थानच्या खजिन्यात ही दिसून येत नाहीत त्यामुळे या अर्पण केलेल्या वस्तू जातात कुठे असा गुढ प्रश्न भाविकांना पडला आहे.
Previous Post Next Post