आटपाडी प्रतिनिधी
खानापूर मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा अंतर्गत पडळकर गटांने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नसल्याने निवडणुकीचे अंतिम चित्र अस्पष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर पडळकर गटाच्या वतीने उद्या मंगळवार ता. 12 रोजी करगणी ता. आटपाडी येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आ. गोपीचंद पडळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे करगणी येथे होणाऱ्या बैठकीकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
आ. गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत असल्याने या मतदारसंघांमध्ये त्यांच्या गटाने सुरुवातीपासून सावध पवित्रा घेत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. इच्छुक उमेदवार माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर या गटाचे प्रमुख शिलेदार जत मतदारसंघांमध्ये दाखल झाले आहेत .मात्र कार्यकर्ते अध्यापही आ. पडळकर यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने सुहास बाबर यांना उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपातील पडळकर गटाने अनुपस्थित राहुन स्वतंत्र उमेदवारी दाखल करणे पसंत केले होते. पडळकर गटाच्या वतीने उमेदवारी परत घेतल्यानंतरही शिवसेनेच्या प्रचार साहित्यावर कोठेही आमदार पडळकर यांचा फोटो नसल्याने समर्थकातील नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड होत आहे . त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्ष असूनही टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या उद्घाटनाला आ. पडळकर अनुपस्थित राहिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पडळकर गट हा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का हा प्रश्न आहे.
महाविकास आघाडी ही पडळकर यांची नंबर एकची शत्रू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांना आमदार पडळकर यांनी नेहमी अंगावर घेतले आहे. त्यामुळे त्यांनाही पाठिंब्याची शक्यता वाटत नाही.
आटपाडी तालुक्याची अस्मिता म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजीआमदार राजेंद्र अण्णा देशमुख व पडळकर हे एकाच पक्षात काम करीत होते. मात्र निवडणुकीपूर्वी अण्णांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन तुतारी हाती घेतली व त्यानंतर अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना तालुक्यातील विविध गटाने पाठिंबा दिला असला तरी पडळकर सामील होणार का हे उद्याच्या बैठकीत ठरेल.
आमदार गोपीचंद पडळकर यांना मानणारा एक मोठा गट मतदार संघामध्ये कार्यरत आहे. महायुतीतील घटक पक्ष, पारंपारिक शत्रू, तालुक्याची अस्मिता असे अनेक मुद्दे चर्चेत असले तरी आ. पडळकर सांगतील तोच आदेश अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
मतदारसंघांमध्ये सध्या तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांतून मतांची आकडेवारी सांगून विजयाचे दावे सांगितले जात आहेत. अशा परिस्थितीत पडळकर गटाची निर्णयक मते कोणाला मिळणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे .यामुळे उद्या प्रभू रामचंद्रांच्या करगणीमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.