आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील सिद्धनाथ नवरात्र उत्सवा दरम्यान ता. २ रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटप सोहळा व ता. ३ रोजी पांशाकुशा एकादशीच्या मुहूर्तावर चिंचाळे हद्दीतील देव सीमोल्लंघन संपन्न झाले.
नवरात्र उत्सवा दरम्यान घटस्थापने नंतर खरसुंडी येथे त्रिकाल धुपारती, जागर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या उत्सव मूर्तीची सदर बैठी, नंदी ,काळवीट ,व्याघ्र ,अश्व ,गेंडा जिराफ ,हत्ती ,गरुड अशा विविध प्राण्यावर आरुढ पूजा बांधण्यात आली होती. तर फेरपूजेनिमित्त प्रथमच श्री सिद्धनाथांची दत्त अवतारातील योगी रुपातील पूजा बांधण्यात आली होती.
बुधवारी घट विसर्जन झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे जोगेश्वरी मंदिर हरजागरासाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान झाले. जोगेश्वरी मंदिरात श्रींचा हरजागरा निमित्त मुक्काम झाला. ता. २गुरूवार रोजी विजयादशमी निमित्त श्रींची सदरे वरील राजेशाही थाटातील बैठकी पूजा बांधण्यात आली होती. तर जोगेश्वरी देवीची व्याघ्र व गरुडावर आरुढ पूजा बांधण्यात आली होती. सकाळी नऊ वाजल्यानंतर भाविकांनी साखर वाटपास सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झांज पथक व लेझीम वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. घडशी समाजातील सेवेकर्यांनी विविध रूपातील सोंगे सादर करून आपली सेवा रुजू केली. यावेळी देवस्थानच्या वतीने उत्सवात सहभागी सर्व मानकरी, सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी श्रींची पालखी मुख्य मंदिरात आज परत आली . सायंकाळी गाव सीमोल्लंघन संपन्न झाले.
शुक्रवार ता. 3 रोजी पांशाकुशा एकादशीच्या मुहूर्तावर देव सीमोल्लंघन संपन्न झाले. दुपारी दोन वाजता देवस्थानचे मानकरी हर्षवर्धन देशमुख यांचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर अडीच वाजता पालखीने शाही व पारंपरिक थाटाच्या लवाजम्यासह मुख्य मंदिरातून चिंचाळे कडे प्रस्थान केले. जोगेश्वरी , वेताळगुरु मंदिर मार्गे बगाडाच्या म्हसोबाला आरती करून पालखी सोहळा गतीने सीमोल्लंघनाच्या माळावर पोहोचला त्या ठिकाणी चिंचाळे ग्रामस्थांकडून श्रींचे भव्य स्वागत करण्यात आले. विश्रांती कट्टयावर सोहळा दर्शनासाठी काही काळ विसावला. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने पालखीला दोर बांधून सीमोल्लंघन करण्यात आले .सायंकाळी गाव ओठ्यावर शस्त्र पूजन करण्यात आले .त्यानंतर नगर प्रदक्षिणेस सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी श्रींचे फटाक्यांच्या आताषबाजीत स्वागत करून विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप केले. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती .यावेळी बँड पथकांची सुरेल जुगलबंदी सादर करण्यात आली. उत्तर रात्री पालखी सोहळा मुख्य मंदिरात परत आल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्ट ,श्री पूजक, सेवेकरी, मानकरी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी परिश्रम घेतले.
खरसुंडी ता आटपाडी येथे देव सीमोल्लंघन सोहळ्या निमीत्त पालखी सोहळ्याचे चिंचाळे येथील माळावर ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले छायाचित्र.