आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ नवरात्र उत्सवात सोमवार ता.२२ रोजी घटस्थापने पासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिर व परिसरामध्ये मोठी तयारी सुरू आहे. मुख्य मंदिरामध्ये नवरात्र उत्सवा दरम्यान व नित्य वापरातील देवाची वस्त्रे तसेच अलंकार यांची साफसफाई करण्यात आली आहे .
सोमवार ता. २२ रोजी मुख्य मंदिरात विधिवत घटस्थापना होणार असून मंगळवार ता. ३० रोजी सिद्धनाथ मंदिर हरजागर होणार आहे. बुधवार ता.१ आक्टोंबर रोजी घटउत्थापन(विसर्जन) असुन त्या दिवशी जोगेश्वरी मंदिर हरजागर संपन्न होईल ,तसेच या दिवशी श्रींचा जोगेश्वरी मंदिरात मुक्काम असणार आहे. गुरुवार ता.२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटप सोहळा व उत्तर रात्री फेरपूजा संपन्न होईल. शुक्रवार ता. ३ रोजी चिंचाळे हद्दीतील देवसीमोल्लंघन होणार असून दुपारी अडीच वाजता श्रींच्या पालखीचे चिंचाळे कडे प्रस्थान होणार आहे .सायंकाळी शस्त्र पूजन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणेला प्रारंभ होईल. उत्तर रात्री पालखी मुख्य मंदिरात परत आल्यानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होईल .
नवरात्र उत्सवा दरम्यान त्रिकाल धुपारती, उत्सव मूर्तीची विविध रूपातील पूजा ,जागर तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खरसुंडी ता.आटपाडी येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे.