खरसुंडी प्रतिनिधी
चांगभलंचा जयघोष आणि तरुणाईचा जल्लोषात येथील चैत्र यात्रेत रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आज रथोत्सवा निमित्त मुख्य मंदिरात अश्वारूढ पुजा बांधण्यात आली होती. सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी एकत्र येऊन सामूहिक नैवेद्य अर्पण केले. दुपारी तीन वाजता रथोत्सवासाठी पालखी व रथ सज्ज करण्यात आला .त्यावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी भगव्या रंगाची पेशवाई पगडी, त्यावर सुवर्ण शिरपेच, गळ्यात शिंगी ,शैली ,मोत्यांचा कंठा व सुवर्ण अलंकार आणि मस्तकी तुरा धारण केलेली उत्सव मूर्ती पालखीमध्ये विराजमान करण्यात आली होती. धुपारतीबरोबरच्या शाही लवाजव्यासह पालखीने रथोत्सवसाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. मुख्य पेठेत पालखी आल्यानंतर ती रथामध्ये विराजमान करण्यात आली. त्यानंतर रथाचा जोगेश्वरी मंदिराकडे प्रवास सुरू झाला. रथा पुढे असलेल्या डॉल्बीच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला. चांगभलं चा गजर ,गुलाल खोबऱ्याची उधळण आणि तरुणाईचा जल्लोष यामुळे रथोत्सवात रंगत निर्माण झाली. ठीक ठिकाणी यंत्राद्वारे रथावर गुलालाची उधळण करण्यात येत होती .चांगभलच्या गजरात भाविक रथ ओढत होते .जोगेश्वरी मंदिरात मानपान झाल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिरात आल्यानंतर रथोत्सवाची सांगता करण्यात आली.