खरसुंडी प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील पोलीस पाटील बापूराव इंगवले यांना सन २३/२४ करिता विशेष सेवा राज्यपाल पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
एक मे महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय सांगली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांमध्ये महसूल विभागात शेवटचा घटक म्हणून प्रशासन व जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे तसेच विविध शासकीय उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी राहिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे, पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व मान्यवर उपस्थित होते. श्री इंगवले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार सागर ढवळे, आटपाडी पोलिस ठाणे व खरसुंडी आऊट पोस्ट कडील सर्व अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ त्याचबरोबर खासदार विशाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.