ब्रेकिंग न्यूज

लोकसभा निकालाची आटपाडीत उत्कंठा

लोकसभा निकालाची आटपाडीत उत्कंठा
आटपाडी प्रतिनिधी 
नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत जिल्ह्याबरोबरच आटपाडीत ही उत्कंठा शिगेला  पोहचली आहे. ता.४  जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत कमळ की लिफाफा  बाजी मारणार याबाबत तालुक्यात तर्कवितर्क व पैजा  सुरू आहेत .मात्र यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यात मोठी  चुरस दिसून आली. निवडणुकीत मतदानापूर्वी व नंतरचा रागरंग व गाठीभेटी  पाहता तालुक्यामध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्हे आहेत. भाजपा उमेदवार  संजय काका पाटील यांच्यासाठी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख गट ,रिपाई आठवले गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  वैभव पाटील हे सर्वजण एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याचे लक्ष ठेवले होते तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षातील जयदीप भोसले, डी. एम .पाटील सर  व वसंतदादा प्रेमी,बहुजन विकास आघाडी यांना बरोबर घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना व  मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणुकीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
           निवडणुकीच्या मैदानात भाजपाने नियोजनबद्ध प्रचार करून तालुक्यात चांगले वातावरण निर्माण  केले होते. तर विशाल पाटील यांनी जाहीर प्रचारावर भर न देता आपल्या छुप्या मित्रांच्या  भरवशावर राहणे पसंत केले. चंद्रहार पाटील यांना स्थानिक पक्ष संघटनेचा मेळ न बसल्याने व मित्र पक्षांनी साथ सोडल्याने प्रचारामध्ये आघाडी घेता आली नाही .
     वरील प्रमाणे मतदानापूर्वीचे चित्र असले तरी मतदानाच्या अगोदर दोन दिवस अनेक राजकीय घडामोडी घडल्याने निकालाबाबत तर्कवितर्कांना उधान आले आहे. 
       गत वेळीच्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना तालुक्यामध्ये १२  गावात, गोपीचंद पडळकर यांना ५५ गावात तर विशाल पाटील यांना केवळ ४ गावात मताधिक्य मिळाले होते. या बाबीचा  व भाजपच्या दिमतीला असणाऱ्या तगड्या फौजेचा विचार करता संजय काका यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती मात्र मतदानापूर्वी मित्रपक्षाने सोडलेली साथ व समन्वयाचा अभाव यामुळे  अपेक्षित मताधिक्या बाबत साशंकता  आहे तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिळालेली सहानभूती व धनुष्यबाणाची मदत यामुळे गतवेळे पेक्षा अधिक मतांची अपेक्षा आहे. तर चंद्रहार पाटील यांना लोकांच्या प्रतिसादाची साशंकता आहे.
 दोन्ही बाजूने मताधिक्याचे दावे केले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळी असणार आहे .त्यामुळे तालुक्यात मताधिक्य कोणाला याची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचे मंडप उतरताच विधानसभा निवडणुकीच्या छावण्या टाकल्या जातील. त्यामुळे लोकसभा ही विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे. 




            नाथाचा गुलाल कुणाला ....
निवडणुकीच्या मैदानातील मातब्बर उमेदवार संजय काका पाटील व विशाल पाटील  या दोघांचेही आटपाडी तालुक्यातील खरसुंडी  सिद्धनाथ हे  कुलदैवत आहे. या दोन्ही उमेदवारांनी व समर्थकांनी  विजयासाठी साकडे घातले आहे .त्यामुळे श्री सिद्धनाथांचा आशीर्वाद रूपी गुलाल कोणाला मिळणार यांची उत्सुकता आहे.  


Previous Post Next Post