आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी गावचे सुपुत्र रविकिरण जावीर यांचे पंचम फिल्मस् निर्मित गावकी या चित्रपटास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दिव्यदृष्टी प्लेयर या ॲपवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
पिढ्यानं पिढ्या चालत आलेली गावकी सांभाळणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबाने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटातील हणमा, जया, दीपक, मीरा, कुलकर्णी व कांबळे सर यांच्यासह पाटील, सरपंच व अन्य पात्रांनी केलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. चित्रपटातील मीरा व दीपक यांची हळुवार फुलणारी प्रेम कहाणी शेवटी विधवा विवाहाचा सामाजिक संदेश देऊन जाते. उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत व ध्वनी व्यवस्था यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने आपल्या भागातील आपल्या लोकांचा सिनेमा वाटतो. रविकीरण जावीर यांच्या या चित्रपट निर्मितीने माणदेशाची चित्रपट परंपरा अखंडीत राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.