आटपाडी प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात आटपाडीत जीम चालवणाऱ्या संग्राम देशमुख याने एका अल्पवयीन मुलीला चार चाकी गाडीतून पळवून नेऊन धमकी देत बलात्कार केला होता .या प्रकरणाचे तालुकाभर विविध स्तरातून तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर आज सर्वपक्षीय बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी बसस्थानकापासून या मोर्चास सुरुवात करण्यात आली. यावेळी मोर्चात महाविद्यालयीन मुले, मुली, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गुन्हेगारास व सहाय्य करणाऱ्या महिलेस कडक शिक्षा द्या, मुलींना संरक्षण द्या अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्या ठिकाणी ठिय्या मारण्यात आला व मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपीला जर जामीन झाला तर घरातून ओढून मारण्यात येईल त्यामध्ये मी स्वतः पुढे असेल असा इशारा दिला.
माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले या आरोपीची प्रथमत: आटपाडीतून धिंड काढली पाहिजे. तसेच अशा प्रवृत्तींना पाठिंबा देणाऱ्यांचा निषेध व्यक्त करून त्यांनी आरोपीस साहाय्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाला अडचणीत येण्याचा इशारा दिला.
यावेळी राजेंद्र खरात, यु.टी. जाधव ,चंद्रकांत काळे, पृथ्वीराज पाटील, अनिता पाटील ,गुलशन वंजारी, नितीन कुलकर्णी, स्नेहजीत पोतदार ,अरुण वाघमारे ,चंद्रकांत दौंडे आदींनी मनोगत व्यक्त करताना या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपीस व सहाय्य करणाऱ्या महिलेस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित महिला व युवती यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या .त्यानंतर तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना निवेदन देण्यात आले. आज सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.